हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यांना घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हैदराबाद येथे खासगी विमान पाठवले आहे. रविवारी सायंकाळी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचे विश्वासू आमदार म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार बांगर यांनी एकहाती विजय मिळवला. हिंगोली येथे शनिवारी मारहाणीमध्ये आमदार बांगर यांचे पुतणे गौरव बांगर यांना पोटात गोळी लागली. गौरव यांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या देखभालीसाठी आमदार बांगर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हैदराबाद येथे थांबले आहेत. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश दिले. त्यांना हैदराबाद येथून मुंबईला येण्यासाठी खासगी विमानही पाठविले. त्यामुळे दुपारी खासगी विमान हैदराबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतर सायंकाळीच आमदार बांगर मुंबईला रवाना झाले.