Sanju Samson : टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या संजू सॅमसनला (Sanju Samson) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मार्च २०२६ साठी आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या पुरस्कारासाठी संजू सॅमसनने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यावर मात केली. संजू सॅमसनने टी२० विश्वचषक २०२६ मध्ये केवळ ५ सामन्यांत खेळताना ८०.२ च्या सरासरीने ३२१ धावा केल्या. त्याची स्ट्राइक रेट १९९.३७ इतकी जबरदस्त होती. विशेष म्हणजे नॉकआऊट स्टेजमध्ये त्याने कमाल कामगिरी केली. सेमीफायनल आणि फायनलसह महत्वाच्या सामन्यांत त्याने तीन ८०+ स्कोर्स केले, ज्यात स्ट्राइक रेट १९० पेक्षा जास्त होता. संजू सॅमसनची विश्वचषकातील ठळक कामगिरी सेमीफायनल : अर्धशतक फटकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. फायनल (न्यूझीलंड विरुद्ध): ४६ चेंडूत ८९ धावा विश्वचषकातील सर्वाधिक सिक्सेस (२४) ठोकण्याचा विक्रमही त्याने केला. तो टी२० विश्वचषक २०२६ साठी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट देखील ठरला. संजू सॅमसनने सुपर एट्समध्ये परत येताच दमदार फॉर्म दाखवला. त्याने ९७ (५० चेंडूत), सेमीफायनलमध्ये ८९ आणि फायनलमध्ये ८९ अशा तीन जबरदस्त खेळी करत भारताला तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्यात मदत केली. भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडला ९६ धावांनी मोठ्या फरकाने पराभूत केले. संजू सॅमसनचा टी-२० विश्वचषकात नवा जागतिक विक्रम जसप्रीत बुमराहची अप्रतिम गोलंदाजी जसप्रीत बुमराहने देखील विश्वचषकात कमालीची गोलंदाजी केली. त्याने ८ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनमी रेट केवळ ६.२१ रन्स प्रति ओव्हर होता. फायनलमध्ये बुमराहने ४ विकेट्स घेत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. संजू आणि बुमराह दोघेही मार्च महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकित होते, पण यात संजूने बाजी मारली. संजू सॅमसनची प्रतिक्रिया पुरस्कार मिळाल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, “आयसीसीचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. टी२० विश्वचषक जिंकणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात किंमती क्षण आहे. कोच आणि सिलेक्टर्सनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. टीमसाठी योगदान देणे आणि विजयात वाटा उचलणे हेच माझे ध्येय होते.”