Kolkata Rape Case: दोषी ठरवल्यानंतर संजय रॉय म्हणाला – ‘मला फसवले, आरोपींमध्ये आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश’

Kolkata Rape Case: कोलकाता ट्रेनी डॉक्टर बलात्कार प्रकरणात न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शनिवारी (18 जानेवारी) सियालदह सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. मात्र, संजय रॉयने न्यायालयात स्वत:ला निर्दोष घोषित केले आहे. तो म्हणाला की, मला खोट्या आरोपात गोवण्यात आले आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडून देण्यात आले आहे, एक आयपीएस अधिकारी या प्रकरणात गुंतला आहे, असा आरोपही रॉयने केला आहे.
संजय रॉय कोर्टात काय म्हणाला?
कोलकात्याच्या सियालदाह न्यायालयात दोषी ठरल्यानंतर संजय रॉय म्हणाला की, मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले आहे. हा गुन्हा मी केलेला नाही. खरे गुन्हेगार मोकाट सुटत आहेत.
सोमवारी शिक्षा जाहीर केली जाणार –
सोमवारी (20 जानेवारी) दोषीला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. त्याच दिवशी शिक्षेची घोषणा केली जाईल. भारतीय न्यायिक संहितेच्या (BNS) कलम 64 (बलात्कार) आणि कलम 66 आणि 103 (1) (हत्या) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला. कलम 103 (1) अंतर्गत कमाल शिक्षा मृत्यू किंवा जन्मठेपेची आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये 28 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी नागरी स्वयंसेवक संजय रॉयला अटक केली. मात्र, या प्रकरणात इतर लोकांचाही यात सहभाग असण्याची शक्यता पीडितेचे कुटुंबीय आणि कनिष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
पीडितेचे कुटुंबीय काय म्हणाले ?
पीडितेच्या पालकांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आणि न्यायव्यवस्थेने त्यांच्या विश्वासाचा आदर केला असल्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येविरोधात देशभरात निदर्शने झाली. तसेच देशभरातील डॉक्टर अनेक दिवस संपावर गेले होते.

