नवी दिल्ली : जपान आणि चीनमध्येही त्यांच्या वाढत्या विकासदराच्या काळात चलनाचे मूल्य कमी झाले होते. त्यामुळे सध्या घसरत असलेल्या रुपयाच्या मूल्याबद्दल आपल्याला फारसे चिंता नाही असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय यांनी व्यक्त केले आहे.एका माध्यम समूहाने आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत बोलताना संन्याल म्हणाले की, 1990 पासून रुपयाचे मूल्य जागतिक चलन बाजारानुसार ठरवू दिले जात आहे. रुपयाच्या मूल्यात फारच चढउतार झाले तर रिझर्व बँक मर्यादित प्रमाणात हस्तक्षेप करून मूल्य स्थिर ठेवते. रुपयाचे मूल्य घसरत आहे म्हणून भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे. एखाद्या देशाचा विकासदर प्रदीर्घ काळ जास्त राहत असेल तर तेथे चलनाचे मूल्य संबंधित काळात कमी पातळीवर होते. असाच प्रकार चीन व जपानच्या बाबत घडला असल्याचा दाखला त्यांनी दिला. अजूनही जपान आणि चीनच्या चलनाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत मर्यादित आहे. कारण यामुळे संबंधित देशाला निर्यात करणे जास्त फायदेशीर होते.जोपर्यंत रुपयाच्या अवमूल्यनामुळे देशांतर्गत महागाई वाढत नाही तोपर्यंत रुपयाचे मूल्य कमी झाले तरी काही हरकत नाही. सध्या रुपयाचे मूल्य कमी होत असताना महागाई मात्र एक टक्क्याच्या आत आहे. या बाबीकडे त्याने लक्ष वेधले आणि या आघाडीवर चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आणि रोखे बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत आहेत. भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असली तरी परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येत असून एप्रिल महिन्यापासून भारतीय रुपयाचे मूल्य तब्बल 5.7% कमी झाल्याबद्दल आयातदार चिंता व्यक्त करत आहेत तर निर्यातदार खुश आहेत.