फोन जप्त केलाय तर कोठडीची काय गरज?, संजय सिंह यांच्या रिमांडवर कोर्टाने EDला विचारले

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना बुधवारी ईडीने दारू घोटाळ्यात अटक केली होती. रात्रभर ईडीच्या मुख्यालयात ठेवल्यानंतर सिंह यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने संजय सिंह यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीला विचारले की, तुमच्याकडे संजय सिंह यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना त्यांना अटक करण्यासाठी एवढा वेळ का लागला? तसेच तुम्ही (ईडी) ज्या पैशांच्या व्यवहाराबाबत बोलत आहात, ते खूप जुने प्रकरण आहे, मग अटकेला एवढा विलंब का? ईडीने संजय सिंह यांची 10 दिवसांची कोठडी मागितली असता, न्यायालयाने ईडीला विचारले की, जर तुमच्याकडून संजय सिंह यांचा फोन जप्त झाला असेल, तर कोठडीची गरज का आहे?
ईडीने न्यायालयात सांगितले की, या प्रकरणातील जबाब नुकतेच नोंदवण्यात आले आहेत. दिनेश अरोरा यांच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, त्यांनी संजय सिंह यांच्या घरी 2 कोटी रुपये दिले होते. याशिवाय इंडो स्पिरिटच्या कार्यालयातून संजय सिंह यांच्या घरी एक कोटी रुपयेही देण्यात आले होते. काल (4 ऑक्टोबर 2023) केलेल्या शोधात डिजिटल पुरावे सापडले आहेत. चौकशी करावी लागेल. तसेच संजय सिंह यांचा फोन आम्ही जप्त केल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यात काही संपर्क क्रमांक सापडले आहेत. अधिक तपासाची गरज आहे.
यानंतर कोर्टाने विचारले की, तुम्ही फोन आधीच घेतला आहे. जर आम्ही सीडीआर काढला तर त्याबद्दल काय करणार? ईडीने सांगितले की, तीन जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आम्ही 10 दिवसांची कोठडी मागितली आहे, परंतु नंतर सांगितले की 7 दिवसांची कोठडी दिली तरी ते मान्य आहे.
ईडीने न्यायालयाला सांगितले, दिनेश अरोरा म्हणाले की, संजय सिंह एक प्रभावशाली व्यक्ती आहे. त्यामुळेच त्यांचे नाव आधी घेतले गेले नाही. विजय नायरने त्यांना धमक्याही दिल्या होत्या. अजून दोन लोक आहेत ज्यांची नावे त्याने घेतलेली नाहीत.
संजय सिंह यांच्या वकिलाने हा युक्तिवाद केला –
संजय सिंह यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मोहित माथूर म्हणाले की, काही प्रकरणे अशी आहेत की, ज्यांचा तपास कधीच पूर्ण होत नाही. तपासाची ही प्रक्रिया कधीच थांबणार नाही. आता या प्रकरणातील ईडीचा स्टार साक्षीदार दिनेश अरोरा आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही प्रकरणांमध्ये तो आरोपी होता. दोन्ही खटल्यात सरकारी साक्षीदार झाला आहे. त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोहित माथूर यांनी असा युक्तिवाद केला की, दिनेश अरोरा यांची विश्वासार्हता पूर्णपणे संशयास्पद आहे. तपास यंत्रणेला ज्याला पकडायचे आहे, ते दिनेश अरोरा यांच्या वक्तव्यावरच पकडतात. तपास यंत्रणेने त्याला एकदाही बोलावले नाही. दिनेश अरोरा हेही आपले विधान वारंवार बदलत आहेत. याच न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी दिनेश अरोरा यांना जामीन मंजूर केला तेव्हा त्याचा सूर आणि शैली बदलली.
‘दिनेश अरोरा यांच्या बदलत्या वृत्तीकडे लक्ष द्या’
वकिल माथूर म्हणाले की, दिनेश अरोरा हव्या त्यावेळेस विधाने द्यायला सुरुवात करतात. दिनेश अरोरा यांच्या बदलत्या वृत्तीकडे लक्ष देण्याची माझी विनंती आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांनी एक विधान दिले, जे ईडीला आवडले नाही. त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. माथूर यांनी 14 ऑगस्ट रोजी नोंदवलेले जबाब पाहण्यास सांगितले.
संजय सिंह कोर्टात म्हणाले- माझ्यासाठी वेगळा कायदा का?
संजय सिंह यांनी न्यायालयात सांगितले की, खोट्याला मर्यादा नसते. अमित अरोरा यांना अटक करण्यात आली, मी त्यांच्यासाठी इतका अनोळखी होतो की त्यांना माझे नाव आठवत नव्हते, पण अचानक त्यांना माझे नाव आठवले. दिनेश अरोरा यांनी अनेकदा विधाने केली, त्यांना संजय सिंह यांचे नाव आठवत नव्हते. पण त्याने अचानक काय केले हे तुम्ही स्वतः समजू शकता. असं अचानक काय झालं की सगळ्यांनी माझं नाव घेतलं?
मी हात जोडून विनंती करत आहे, जर त्याच्या आरोपात तथ्य असेल तर मला कठोरात कठोर शिक्षा द्या, असे संजय सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. पण असा निराधार तपास करणे कितपत समर्थनीय आहे? मला एकदाही बोलावले नाही, माझ्यासाठी वेगळा कायदा का?





