बारामती : बारामती नगरपालिकेच्या गटनेतेपदी संजय संघवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित गटाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने संघवी यांच्या नावाला मंजुरी दिली. उपगटनेतेपदी संपदा सुमित चौधर यांची, तर प्रतोदपदी नगरसेवक विशाल भानुदास हिंगणे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संजय संघवी यांच्या निवडीमुळे नगरपालिकेतील गटाचे नेतृत्व अधिक भक्कम होईल, आगामी काळात बारामती शहराच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास गटातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय संघवी यांचा प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य आणि सर्व नगरसेवकांशी असलेले समन्वयाचे संबंध लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाखाली गट अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या वेळी आपण नगर परिषदेत अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदी संधी देऊ शकतो असे वक्तव्य केले होते. त्यानुसार पाच वर्षात किती जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार याची देखील उत्सुकता आहे.