Sanjay Raut : ‘आम्ही शस्त्रांची पुजा करतोय अन् एकनाथ शिंदे…’, मेळाव्यातून संजय राऊतांची बोचरी टीका

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा मुंबईत उत्साहात सुरू झाला. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडेतोड टीका केली. राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करताना म्हटले, “आम्ही शस्त्रांची पूजा करतो, तर ते (शिंदे गट) दिल्लीतून आणलेल्या अमित शहांच्या जोड्यांची पूजा करतात.” या खरमरीत टोल्याने मेळाव्यातील वातावरण तापले.
पावसाच्या सरींखाली आणि चिखलातही हजारो निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडत आहे. राऊत यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितले, “६८ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी जी ठिणगी पेटवली, ती मुसळधार पावसातही विझणार नाही.” मराठवाड्यातील पूरस्थिती आणि पावसाचा मारा यांचा उल्लेख करत त्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “मराठवाडा आठ दिवस पाण्यात आहे, आणि आज आपला हा मेळावा पावसात चिखलात होतोय. हा आपला ‘ओला मेळावा’ आहे.”
संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले, “हे सरकार मत चोरी, लोकसभा-विधानसभा चोरी, शिवसेनेची चोरी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चोरी यातून सत्तेत आले आहे. आता मुंबईतील चोर बाजाराचे नाव ‘मोदी बाजार’ करायला हवे.” यासोबतच त्यांनी केंद्रातील भाजप नेत्यांना लक्ष्य करत म्हटले, “आपल्याला रावणाचे दहन करायचे आहे. दिल्लीचा रावण पावसात बुडवायचा की जाळायचा, याचा विचार करावा लागेल.”





