मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्रित निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतरची ही पहिली निवडणूक आहे. यामध्ये शिंदेसेनेला भाजपपेक्षा कमी जागा देण्यात आल्या आहेत. तर भाजपच्या उमेदवार यादीमध्ये परप्रांतियांचा भरणा आहे. प्रचाराला उत्तरभारतीय नेत्यांना बोलावले जाणार असल्याची माहिती आहे, यावरुन ठाकरेसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचा मराठी माणसाशी, मराठी अस्मितेशी काडीमात्र संबंध नाही. भाजप हा काही मराठी माणसाचा पक्ष नाही. मराठी अस्मितेशी त्यांना काही देणेघेणे नाही. त्यामुळे त्यांच्या उमदेवार यादीमध्ये परप्रांतियांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार असल्याची चर्चा आहे. यावर राऊत म्हणाले, मुंबईत पंतप्रधान मोदींनी प्रचाराला येण्याचे कारण काय आहे? योगी आदित्यनाथ येथे येऊन काय करणार आहेत? भाजपला त्यांच्या येथील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने कोणालाही प्रचाराला आणले तरी मुंबईत ठाकरेबंधूंच निवडणूक जिंकणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोमवारी भाजपची 66 उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये 20 अमराठी उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. या उमेदवारांमध्ये जिग्ना शाह, जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, शिवकुमार झा, मनीषा यादव, स्वाती जैस्वाल, सिद्धार्थ शर्मा, संदीप पटेल, विनोद मिश्रा, तेजिंदरसिंह तिवान, रोहन राठोड, सुधा सिंह, अनिश मकवाना, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, आकाश पुरोहित, रवी राजा यांचा समावेश आहे.