मुंबई – ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना मला बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे’, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन विसांपूर्वी केला होता. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 30 मार्च 2018 रोजी संजय राऊत यांनी बेळगावात एक भाषण केले होते, हे भाषण प्रक्षोभक होते, असा आरोप कर्नाटक पोलिसांनी केला आहे. त्यावरून राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टानं आज समन्स बजावलं असून त्यांना 7 फेब्रुवारीला बेळगाव न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. व्यक्तिगत कारणामुळे आज उपस्थित राहू शकत नसल्याचं संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला कळवलं होतं.
त्यानंतर पुढची तारीख देण्याची विनंती वकिलांनी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही पुढील तारीख दिली आहे. आज 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता संजय राऊत यांना 7 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.
मला तिथे बोलावून हल्ला करण्याचा कट रचला जातोय..!
दोन दिवसांपूर्वी माध्यमंही बोलताना संजय राऊत म्हणाले, “लोकांवर अन्याय केला तर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील या वाक्यात प्रक्षोभक काय आहे, 2018 मध्ये बेळगावात केलेल्या भाषणावर मला आता कर्नाटक पोलिसांची नोटीस आली आहे.
मला कायदेशी बाबीत अडकवून ठेवण्याचे कट सध्या सुरू आहेत, पण मी घाबरणारा नाही. मी तिथं जाणार आहे, माझं अमित शाह यांना आवाहन आहे की तुम्ही त्याकडे लक्ष द्या. नाहीतर आम्हाला भीती वाटतेय की इथे रक्तपात होऊ शकतो. ही आता केंद्राची जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टीत राजकारण नका करू”, असे ते म्हणाले होते.