Sanjay Raut – माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दक्षिण मुंबई लोकसभा जागेबाबत आपल्या पक्षातर्फे कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की आमच्या पक्षाचे अरविंद सावंत हे दोन वेळा येथून खासदार म्हणून विजयी झाले आहेत, त्यामुळे तेच या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. मिलींद देवरा यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर दावा सांगितल्याबद्दल नापसंती व्यक्त केली होती. या मतदार संघातून शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी सन २०१४ आणि सन २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यामुळे सावंत यांनीच पुन्हा निवडणूक लढवण्यात गैर काय? असा सवाल करीत राऊत यांनी याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असे स्पष्ट केले आहे. मिलींद देवरांच्या बाबतीत ते म्हणाले की आता निवडणुक लढवण्यासाठी पक्ष सोडण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश – मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे ते पुत्र आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिंदे गटातील अनेक नेतेमंडळी देखील उपस्थित होते.