“आता काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी…” ; संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत सुनावले

Sanjay Raut on Congress । राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात एकत्र निवडणुका लढवायच्या कि नाही यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेने कडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर निवडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून मविआत खटके उडत असल्याचे दिसत आहे. आघाडीतील काँग्रेसने यावर आक्षेप घेतल्यानंतर आता ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय केली पाहिजे Sanjay Raut on Congress ।
काँग्रेसच्या नाराजीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी,”काँग्रेसच्या नेत्यांनी माझं म्हणणं परत एकदा ऐकले पाहिजे. किंबहुना काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय केली पाहिजे. लोकसभेसाठी आपण इंडिया आघाडी तयार केली होती. राज्यात विधानसभेसाठी महाविकास आघाडी तयार केली होती. अशातच स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या. लोकसभा, विधानसभा या वेगळ्या निवडणुका आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर का स्वबळावर लढल्या तर पक्ष वाढीसाठी ते फायद्याचे ठरेल.” असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
कुणालाही मिरच्या लागण्याचे कारण नाही Sanjay Raut on Congress ।
पुढे बोलताना त्यांनी,”शिवसेनेचे मशाल चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे. अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध होत असते. अशीच सर्व राजकीय पक्षांची धारणा आहे. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असे मी कधीही म्हणालो नाही. केवळ आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या. त्यामुळे कुणालाही मिरच्या लागण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे स्पष्टीकरण देत संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांना त्यांच्या शैलीत सुनावले आहे.
…म्हणून वाल्मिकी कराडला सोडलं
तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांनी, ‘गृहमंत्री म्हणत होते की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला सोडायचे आणि इतर आरोपींना धरायचे असे त्यांचे नेहमीचे धोरण आहे. वाल्मिकी कराड त्यांच्याच पक्षाचा आहे. त्यामुळे त्याला सोडले बाकी लोकांना कापले. छोट्या माश्यांना पडकले,तर मोठ्या माशाला सोडले आहे. तुमच्या पक्षाचे लोक देखील आक्रोश करत आहेत. तरीही तुम्ही बघत नाहीत. म्हणजे तुम्हाला त्यांना वाचवायचे आहे. असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.
पुढे बोलताना, “मी असे कधीही म्हणालो नाही की महाविकास आघाडी फुटली आहे. आमचा कोणताही नेता म्हणाला नाही. आम्ही केवळ उध्दव ठाकरे यांना कार्यकर्त्यांची भूमिका कळवली. विधानसभेला महाविकास आघाडी होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी आम्ही एकटे लढणार आहोत. भाजपसोबत युती असताना देखील आम्ही एकटे लढलो होतो” अशी स्पष्टोक्ती ही खासदार संजय राऊतांनी यावेळी दिली.





