Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत चर्चा करणे अमानवीय असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. काही नेत्यांनी पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्याची मागणी केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, या क्षणी नेतृत्वाचा विषय काढणे म्हणजे अमानवीपणाची परिसीमा आहे. असा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांमध्ये मानवतेचा पूर्ण अभाव आहे, मग ते मंत्री असोत वा आमदार. त्या महिलेने आपला पती गमावला आहे. सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांतील अश्रू अजून कोरडेही झालेले नाहीत, असे म्हणाताना त्यांनी चर्चा करणार्यांवर ताशेरे ओढले. Sunetra Pawar अजित पवार (६६) यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेससह संपूर्ण महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.