Sanjay Raut | Eknath Shinde – राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच, राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली. या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे सभेमागून सभा आणि आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. मुंबईत आयोजित एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते निमंत्रित होते. याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची समोरासमोर भेट झाली. केवळ नजरानजर न होता दोघांमध्ये सुमारे एक ते दीड मिनिटे बातचीत देखील झाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या आरोग्याबद्दल आस्थेने विचारणा केली, तर राऊत यांनीही त्यांना प्रतिसाद दिला. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक आणि सौजन्यपूर्ण होती. यापूर्वीही जेव्हा संजय राऊत यांची तब्येत खालावली होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्ष फुटला होता. यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्याने तो पक्ष अधिकृत शिवसेना ठरला होता. या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड वितुष्ट आले होते. मुंबई महानगपालिका निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यापासून ठाकरे कुटुंबीय सातत्याने एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. संजय राऊतही त्यांच्या पत्रकारपरिषदेत सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड करत असतात. मात्र, आज हे राजकीय मतभेद बाजुला सारुन या दोन्ही नेत्यांनी सुसंस्कृतपणे एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यामुळे सध्या राज्यातच्या राजकारणात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.