मुंबई : राज्याच्या राजकारणात हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात हनी ट्रॅपचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे सांगितले. पण त्यांची ही माहिती दिशाभूल करणारी आहे. राऊत यांनी एक फोटो शेअर करत, त्या एका फोटोची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दुध का दूध पानी का पानी होईल!असे म्हणत, या चौकशीतून सत्य समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊत यांच्या दाव्यानुसार, या हनी ट्रॅप प्रकरणात चार मंत्री आणि अनेक अधिकारी अडकले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतात. विशेष म्हणजे, राऊत यांनी शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सामील झालेल्या काही तरुण खासदारांनाही या हनी ट्रॅपमुळेच पळावे लागले, असा दावा केला आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने आता केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणात लक्ष घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील विधानावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत आणि पुराव्यादाखल एका फोटोचा उल्लेख करत राऊत यांनी हे प्रकरण अधिक गंभीर बनवले आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.