‘हिंमत असेल तर दाऊद इब्राहिमच्या …’, तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांची सरकारवर टीका

Sanjay Raut । मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील गुन्हेगार तहव्वुर राणाला लवकरच भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. २००९ मध्ये एफबीआयने त्याला अटक केली होती. आता भारतात यावरून राजकारण तीव्र झाले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या प्रत्यार्पणावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार तहव्वूर आणून एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित करेल. पण “जर तुमच्यात हिंमत असेल तर दाऊद इब्राहिमला आणा. छोटा शकीलला आणा. तुम्ही त्यांना का आणत नाही? नीरव मोदी आणि मेहुल चौकसीला का आणत नाही?”असे म्हणत मोदी सरकारवर टीका केली.
संजय राऊत यांचा अमित शहांवर निशाणा Sanjay Raut ।
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या प्रत्यार्पणाविषयी प्रतिक्रिया दिली. “अमित शहा हे फक्त महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी, येथील नेत्यांना बदनाम करण्यासाठी मुंबईत येतात. अमित शहांनी जम्मू-काश्मीर, मणिपूरला जावे, जिथे गृहमंत्र्यांची सर्वात जास्त गरज आहे.”असे त्यांनी म्हटले.
दरम्यान,२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा हा हवा आहे आणि भारत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. यापूर्वी, तो सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नॉर्दर्न सर्किटसह अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरला होता. राणा यांनी १३ नोव्हेंबर रोजी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
तहव्वुर राणा हा लष्कर-ए-तैयबाचा सदस्य Sanjay Raut ।
मुंबई हल्ल्याच्या ४०५ पानांच्या आरोपपत्रात राणाचे नाव आरोपी म्हणूनही नमूद केले आहे, त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. तो हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत होता. राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे. यापूर्वी, अमेरिकन सरकारने न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की पुनर्विचार याचिका फेटाळली पाहिजे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी ताजमहाल हॉटेल पॅलेस, ओबेरॉय ट्रायडंट, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, लिओपोल्ड कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मेट्रो सिनेमा आणि सेंट झेवियर्स कॉलेजला लक्ष्य केले.





