Sanjay Pandey : एका व्यावसायिकाविरुद्धचा फौजदारी खटला हेतुपुरस्सर पुन्हा उघडल्याचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध विशिष्ट विधाने करण्यास त्या व्यावसायिकाला भाग पाडल्याच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांना बुधवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या प्रकरणी संजय पांडे (Sanjay Pandey) आणि ठाणे शहरातील इतर काही व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा रद्द केला आहे. या प्रकरणी संजय पांडे यांच्यासह वकील शेखर जगताप आणि अन्य काहींनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. Sanjay Pandey मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. सुमन श्याम यांच्या विशेष खंडपीठाने या याचिकांवर बुधवारी निकाल देताना पांडे आणि जगताप यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. ठाणे आणि कुलाबा पोलीस ठाण्यांमध्ये पांडे (Sanjay Pandey) यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यानुसार, पांडे यांनी व्यावसायिक संजय पुनामिया यांच्याविरुद्धचा फौजदारी खटला पुन्हा उघडला. तर जगताप यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यांच्याविरुद्धच्या प्रलंबित खटल्यात कोणतेही अधिकृत नियुक्तीपत्र नसतानाही विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिल्याचा आरोप पुनामिया यांनी केला होता.