Maharashtra Politics : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून मुंबईत वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या विधानानंतर दहिसरमध्ये तणाव निर्माण झाला असून, मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. (Maharashtra Politics) दहिसरमधील गणपत पाटील नगर येथे ऑटोचालकांशी संवाद साधताना निरुपम म्हणाले की, “मराठी भाषेला आमचा कोणताही विरोध नाही. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान व्हायलाच हवा. मात्र मराठीच्या नावाखाली जबरदस्ती, धमकावणे किंवा गुंडगिरी करणे चुकीचे आहे आणि आम्ही त्याला विरोध करतो.” (Maharashtra Politics) तसेच त्यांनी सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना सांगितले की, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकावी ही अपेक्षा योग्य असली तरी त्यासाठी वेळ दिला पाहिजे. अनेक चालकांना मराठी येत नाही, त्यामुळे थेट परीक्षा घेऊन परवाने रद्द करण्याची अट घातल्यास त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते आणि कार्यकर्ते दाखल झाले. त्यांनी घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती चिघळल्यानंतर काही कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. (Maharashtra Politics) घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.