संजय गायकवाड Vs इम्तियाज जलील! ‘बॉक्सिंग’चा करारनामा देत जलील यांना दिले थेट ओपन चॅलेंज

Sanjay Gaikwad Vs Imtiaz Jaleel | शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा आमदार निवासातील कँटिनमध्ये शिळे वरण मिळाल्याने चालकाला टॉवेलवर येऊन मारहाण केल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना आव्हान दिले आहे. आता दोघांमध्ये लढाई होणार असल्याचे म्हंटले जात आहे. तसा करारनामा गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे.
त्याचं झालं असं की, छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मी जर त्या कँटिनचालकाच्या जागी असतो तर संजय गायकवाड यांची धुलाई केली असते,’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय गायकवाड यांनी ‘कॅण्टीन मालक जरी जलील असते तर त्यांनाही चोपले असते’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर ‘जगा तेरी, दिन तेरा, वक्त भी तेरा आजा कहा लढना है,’ असा प्रति आव्हान जलील यांनी दिले होते. Sanjay Gaikwad Vs Imtiaz Jaleel |
त्यावर ‘हिंमत असेल तर आझाद मैदानावर, ये तुला दाखवतो’, म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्या चॅलेंजला प्रत्युत्तर दिलं आहे.
जबाबदारी आमच्या दोघांची
आता माजी खासदार इम्तियाज जलील यांचे आव्हान स्वीकारत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिला आहे. त्यात त्यांनी जलील आणि माझी लढाई होईल. यात दगड धोंडे, वा इतर शस्रांचा वापर होणार नाही. आमच्या लढाईत तिसरा येणार नाही. या लढाईत काही बरेवाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील. त्यासाठी कोणीही कुठलीही प्रकारची तक्रार संबधीत विभागास करणार नाही, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.
‘दोघेही ह्या प्रकरणात आपला पक्ष किंवा आपला धर्मामध्ये आणणार नाही किंवा त्याचा आधार घेणार नाही. ह्या बाबत कोणीही मित्र, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ता, यांना मध्ये घेणार नाही. जी लढाई होईल ती ज्या जिल्ह्यात होईल, तेथील पोलीसांच्या साक्षीने होईल. या लढाईची तारीख, वेळ आणि स्थळ जलील यांनी ठरवावे’, असा करारनामा संजय गायकवाड यांनी मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयात पाठवला आहे.
दरम्यान, आमदार निवासातील कॅन्टीनमधील मारहाणीच्या प्रकरणांनंतर संजय गायकवाड यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर कँटिन चालकावर देखील कारवाई होत त्याचा परवना रद्द झाला होता. Sanjay Gaikwad Vs Imtiaz Jaleel |
हेही वाचा :
इटलीमध्ये आणखी एक विमान अपघात ! रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर कोसळले विमान ; अपघातात दोघांचा मृत्यू





