Pimpri : सांगवी पोलिसांकडून रिक्षाचालकाचा सत्कार

सांगवी : आज सोन्याचे भाव गगणाला भिडले असताना थोडीही लालसा न दाखवता एका रिक्षाचालकाने प्रवाशाची रिक्षात विसरलेली सोन्याची अंगठी परत केली. याबद्दल सांगवी पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालक रवींद्र वसंत देवकुळे यांचा सत्कार केला.
यावेळी सांगवी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर, उपनिरीक्षक संदीप खलाटे, बाळू सुपे, राजेंद्र भिसे, देविदास जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकट, मनोज सतेलू आदी उपस्थित होते.
श्रेयस पुरोहित हे रिक्षामधून सांगवी ते बाणेर असा प्रवास होते. त्यावेळी त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी रिक्षामध्ये पडली. बाणेरमध्ये रिक्षातून उतरून काही अंतरावर गेल्यावर बोटात अंगठी नसल्याचे निदर्शनास आले. तत्पूर्वी रिक्षाचालक रवींद्र देवकुळे यांनी रिक्षात अंगठी आढळताच नवी सांगवीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकट यांच्याशी संपर्क करून अंगठीबाबत माहिती दिली.
रिक्षाचालक देवकुळे व सुरेश सकट यांनी सांगवी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर यांच्याकडे अंगठी सुपूर्द केली. काही वेळातच अंगठी हरविलेले ग्रहस्थ पुरोहित तक्रार दाखल करण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यात आले. यावेळी अंगठीची खातरजमा करून अंगठी त्यांच्याकडे सुपूर्द केली. रिक्षाचालक रवींद्र देवकुळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सांगवी पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार केला.





