Sangram Thopate : एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. ज्या नगरपालिकेत काँग्रेसने तब्बल ५० वर्षे सत्ता गाजवली, तिथे यंदा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा एकही उमेदवार काँग्रेसला उभा करता आलेला नाही. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची झालेली ही दयनीय अवस्था जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी शोकांतिका ठरली आहे. अजित पवार विरुद्ध भाजप थेट लढत : सध्या भोर नगरपालिकेची निवडणूक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होम ग्राउंड विरुद्ध काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांना स्वतःला सिद्ध करण्याची लढाई बनली आहे. निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही यात उडी घेतली होती, मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पळवून आणून थेट पक्षप्रवेश दिला आहे. ‘मुख्यमंत्री विरुद्ध पालकमंत्री’ असा शाब्दिक संघर्ष : प्रचार शुभारंभासाठी आलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आणि अजित पवारांची सत्ता असली तरी मुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस आहेत. हे लक्षात ठेवूनच भोरच्या जनतेने मुख्यमंत्र्यांना मतदान करावे,” असे आवाहन केले. त्याला अजित पवारांचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी तात्काळ उत्तर दिले. “मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी पालकमंत्री हे अजित पवार आहेत. जोपर्यंत अजित पवारांच्या सहीने खालून प्रस्ताव जात नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री सहीच करू शकत नाहीत. त्याचे भान ठेवून मतदारांनी मतदान करावे,” असे म्हणत मांडेकर यांनी पाटलांच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले. थोपटे काँग्रेस ते थोपटे भाजप : राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी ज्या मैदानावर उतरले आहेत, ते मैदान गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसचा गड म्हणून ओळखले जात होते. * पहिली ३० वर्षे: माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी भोर परिसरात काँग्रेसचा किल्ला मजबूत केला. * पुढची २० वर्षे: त्यांचे चिरंजीव माजी आमदार संग्राम थोपटे यांनी हा किल्ला आणखीन बळकट करण्याचे काम केले. यामुळे भोर आणि काँग्रेस असे एक समीकरणच बनले होते. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत स्थानिक पातळीवरील संपूर्ण काँग्रेस भाजपमय झाली. ५० वर्षांच्या सत्तेनंतर शून्य : थोपटे यांच्या जाण्याने भोरमधील काँग्रेस पोरकी झाली आहे. जुने काँग्रेसजन सांगतात की, “जी काँग्रेस होती, ती थोपटे काँग्रेस होती आणि आता ती ‘थोपटे भाजप’ झाली आहे.” ५० वर्षे ज्या नगरपालिकेत काँग्रेसने सत्ता गाजवली, त्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढणारा एकही उमेदवार पक्षाला मिळालेला नाही, ही शोकांतिका आहे. काँग्रेस संकटात असताना वरिष्ठ पातळीवरून कोणतीही दखल घेतली गेली नाही, अशी खंतही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या गंभीर परिस्थितीत, काँग्रेस पक्ष आपल्या ५० वर्षांच्या गडाकडे आणि आपल्या अस्तित्वाकडे लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.