“संग्राम’ची रॅली ठरली महासंग्राम !

संग्रामसारखा सुपूत्र असता तर विरोधीपक्षनेते अडचणीत नसते – ना. मुंडे

नगर: लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीला मोठी गर्दी झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. या रॅलीनंतर क्‍लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदीसह भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर जोरदार टिका करून संग्रामसारखा सुपूत्र असता तर विरोधी पक्षनेते आज अडचणीत आले नसते असा टोला लगावला.

आ. जगताप यांनी सकाळी 11.15 वाजता पारनेर तालुक्‍यातील जवळा येथील बबनराव रासकर, अंजनाबाई रासकर या शेतकऱ्यांच्या हस्ते मुहूर्त साधत अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार, नानासाहेब फाटके, प्रसन्ना जोशी आदी उपस्थित होते. त्यानंतर साडेबारावाजता जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पायी रॅली काढण्यात आली. या रॅली ना. मुुंडे, आ. जगताप, आ. कांबळे, आ. राहुल जगताप आदी नेते सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून कॉंग्रेस आघाडीने जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले.
या रॅलीनंतर झालेल्या सभेत मुुंडे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांच्या घरावर वाच्यता करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्रपंचाची जबाबदारी घ्यावी. मागच्या वेळी यांनी 15 लाखाचा जुमला फेकला, आता 20 लाखांचाही फेकतील. यांचा काही नेम नाही. भाजपचा स्थापना दिन आणि मोदी दिन (फेकू दिन) एक एप्रिललाच साजरा करावा असा सल्ला देत त्यांनी, तुमच्या वर्तणुकीला अगदी साजेसा दिवस आहे, अशी उपहासात्मक टीका केली.

सुपूत्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप. संग्राम आईवडिलांची आज्ञा तर पाळतातच मात्र ते इथल्या जनतेचेही आज्ञाधारक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहात आंदोलन करून निलंबित होणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव होते. हाच लोकांप्रती खरा कळवळा असलेला युवक आहे. सुपूत्र आणि कुपूत्र यांतील फरक आज नगरवासियांच्या समोर आहे. इथल्या भाजप उमेदवाराचे नाव “कुजय’ असायला हवं होतं अशी खोचक टीका ना. मुंडे यांनी केली.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, अंकुशराव काकडे यांची भाषणे झाली. यावेळी आ.राहुल जगताप, आ. वैभव पिचड, दादा कळमकर, आ.डॉ. सुधीर तांबे, सर्जेराव निमसे, बाबासाहेब भोस, आ. अरुण जगताप, राजेंद्र फाळके, निलेश लंके, नरेंद्र पाटील, चंद्रशेखर घुले, अविनाश आदिक, प्रताप ढाकणे, सिताराम गायकर, सोमनाथ धुत, आशुतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दक्षिणेत संकट येवू देवू नका- थोरात

गावातील गटतट बाजूला ठेवा विरोधकांनी आपलेसे करा, आता सांगतो पुन्हा सांगणार नाही कारण दक्षिणेत ते संकट येवू देवू नका. विखेंना कॉंग्रेसने काय नाही दिले. खासदार, आमदार, मंत्री, विरोधीपक्षनेते, जिल्हा परिषद अध्यक्ष तरी खासदारकी पाहिजे. हा बालहट्‌टामुळे विरोधीपक्षनेते अडचणीत आले.ते आज या व्यासपीठावर पाहिजे होते. पण ते कोठे आहे हे माहिती होत नाही.ते सत्ता व पदासाठी पक्ष बदलतात, असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

जिल्ह्याची नासाडी विखेंमुळेच- आ. जगताप
उत्तरेतून आलेल्या विखेंनी जिल्ह्याची नासाडीच केली आहे. हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या विखेंनी त्यातून खाली उतरून नगर शहरात पाहिले तर त्यांना काय विकास केला हे दिसेल. लोणीत आजवर देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती आणले. पण त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच उपयोग झाली नाही. स्वतःच्या शिक्षण संस्थेचा मात्र त्यांनी फायदा करून घेतला. असा आरोप संग्राम जगताप यांनी यावेळी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.