कंटेनरच्या धडकेत इंदापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा मृत्यू, ऐन दिवाळीत गावावर शोककळा

अहिल्यानगर : पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री. क्षेत्र बाबीर बाबा देवस्थान येथे दर्शनासाठी शनिवारी( दि. २ नोव्हेंबर) मोटरसायकल वर जात असताना आश्वी बुद्रुक (तालुका संगमनेर) येथील दोन भाविकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ऐन पाडव्याचा दिवशी घडलेल्या या घटनेमुळे आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य जाखोबा राणुजी पिलगर व विठ्ठलराव मुरलीधर खेमनर यांचा या अपघातात मृत्यू झाला.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर -मनमाड रोडवर शिंगवे नाईक शिवारात समोरुन येत असलेल्या कंटेनरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली . त्यात दोघांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर शिंगवे गावातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यु झाला. जाखोबा पिलगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुन ,नातवंड असा मोठा परिवार आहे. विठ्ठलराव खेमनर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली सुना,नातु ,जावई असा मोठा परिवार आहे. या घटनेने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.





