सांगली महापालिका उपायुक्त अडकले लाचखोरीच्या सापळ्यात; १० लाखांची मागणी, ७ लाख घेताना रंगेहाथ अटक

सांगली : सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ७ लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. महापालिका क्षेत्रातील २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी त्यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ७ लाखांवर सहमती झाल्यावर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणाने सांगली महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराने बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांच्याकडे अर्ज केला होता. परवानगी मिळवण्यासाठी साबळे यांनी १० लाख रुपये लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करत सापळा रचला. यावेळी साबळे यांनी ७ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील लाचखोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी एसीबीने धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी आणि लिपिकाला ५ लाख रुपये लाच घेताना अटक झाली होती. आता सांगलीतील या कारवाईने वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे. साबळे यांच्या घरी आणि कार्यालयात झडती सुरू असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे सांगली महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनातील पारदर्शकतेची मागणी जोर धरत आहे.


