Wall Collapse : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे कच्ची भिंत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेत १० ते १२ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Wall Collapse) मिळालेल्या माहितीनुसार, मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. याचदरम्यान अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. खराब हवामानामुळे परिसरातील एक कच्ची भिंत अचानक कोसळली आणि त्याखाली अनेक भाविक दबले गेले. (Wall Collapse) घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमींना जत आणि सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Wall Collapse) घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे जत तालुक्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Wall Collapse)