Sangli Crime : खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे चारचाकी वाहनावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात विटा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून ७० हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६ अन्वये आर्मअॅक्ट १९५९ कलम ३, २५, २७ तसेच बीएनएस कलम ३२४(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बाळासाहेब आकराम गुजले (वय ६५, राहणार लेंगरे, ता. खानापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तपास सुरू होता. नेमकी घटना काय ? लेंगरे गावाच्या हद्दीत फिर्यादी यांच्या चारचाकी वाहनावर दि. १५ मे रोजी रात्री साडेनऊ ते १६ मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. घटनेनंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश ऊर्फ सुंदऱ्या दगडू खिलारे (वय २०, रा. लेंगरे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दुसरा आरोपी प्रथमेश ऊर्फ पिन्या मुकुंद शिंदे याने लपवून ठेवलेले पिस्तुल पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे, अमोल पाटील, महेश संकपाळ, विलास मोहिते, करण परदेशी, उत्तम माळी, अक्षय जगदाळे, वैभव कोळी, विजय पाटणकर, महेश देशमुख, किरण खाडे, इम्रान महालकरी यांच्यासह विटा पोलीस ठाणे व सायबर पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे तपास करीत आहेत.