Sangli Accident : सांगलीमध्ये भरधाव बसचा भीषण अपघात; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात एक अत्यंत भीषण अपघाताची (Sangli Accident) घटना समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक खाजगी ट्रॅव्हल्स बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली आणि उलटली.

Sangli Accident : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात एक अत्यंत भीषण अपघाताची (Sangli Accident) घटना समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक खाजगी ट्रॅव्हल्स बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली आणि उलटली.
या भीषण अपघातात (Sangli Accident) बस चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर बसमधील १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पलूस तालुक्यातील घोगाव नजीक कराड-तासगाव मार्गावर हा अपघात घडला.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली ही खाजगी ट्रॅव्हल्स बस कराड-तासगाव मार्गावरून जात असताना घोगाव (ता. पलूस) परिसरात आली. यावेळी बसचा वेग जास्त असल्याने अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि त्यानंतर उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा चालक आणि क्लिनर या दोघांचाही जागीच जीव गेला.
15 प्रवासी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
या अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. बस पलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ आणि पळापळ सुरू झाली. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ग्रामस्थांचा संताप
या भीषण अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. कराड-तासगाव मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे चालकाला अचानक वाहनाचा वेग कमी करावा लागला आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अपूर्ण कामामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच कुंडल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी (Sangli Accident) दाखल झाले. या अपघातानंतर कराड-तासगाव मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी स्थानिक नागरिकांचीही मोठी गर्दी जमली होती.
पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी कुंडल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.






