मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल (दि. 3) हल्ला झाला होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं समोर आले. यात देशपांडे हे जखमी देखील झाले होते. आता या हल्ल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावून आले होते आणि देशपांडे यांना स्टंपने मारहाण केली होती. यावेळी देशपांडे यांच्या पायाला दुखापत झाली होती. याप्रकरणीच गुन्हे विभागाने कारवाई करत भांडुपमधून दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते. दोन्हही आरोपींचा कोणत्या राजकीय पक्षाची संबंध आहे का? त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले? याचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यापैकी एक ‘अशोक खरात’ या व्यक्तीची ओळख पटली आहे. अशोक खरात हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असून, ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भांडुपच्या कोकण नगर भागातून कसली पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यापासून ठाकरे गटावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी क्राईम ब्रांच इतर आरोपींचाही शोध घेत आहेत.
दरम्यान, संदीप दशपांडे यांच्यावर हल्ल्यानंतर हिंदुजा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे कोणते आक्रमक पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.