San Miguel Uribe : कोलंबियाच्या अध्यक्षीय पदाचे संभाव्य उमेदवार सॅन मिग्युएल उरीबे तुर्बेय यांच्यावर गोळीबार

बोगोटा, (कोलंबिया) : कोलंबियात पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये संभाव्य उमेदवार असलेले नेते सॅन मिग्युएल उरीबे तुर्बेय यांच्यावर आज गोळीबार झाला. बोगोटा येथे प्रचार करत असताना झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले हा हिंचार अमान्य असल्याचे त्यांच्या पुराणमतवादी डेमोक्रॅटिक सेंटर पार्टीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
फॅन्टिबोन शहराच्या शेजारच्या एका पार्कमध्ये प्रचाराची सभा सुरू असताना हा गोळीबार झाला. तुर्बेय यांच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आला, असे डेमोक्रॅटिक सेंटर पार्टीच्यावतीने सांगण्यात आले. माजी अध्यक्ष अल्वारो उरिबे यांच्या या पक्षाकडून तुर्बेय यांना पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
रक्तस्राव होत असलेल्या उरिबे तुरर्बेय यांना काही लोक तातडीने घेऊन जात असल्याचे सोशल मीडियावरच्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. तुर्बेय यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञांकडून शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.मिग्युएल हे मृत्यूशी झुंज देत आहेत, असे त्यांच्या पत्नी मारा क्लॉडिया टाराझोना यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कोलंबियाच्या नागरिकांनी तुर्बेय यांच्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाकडून या गोळीबाराच्या प्रकरणाचा तपास केला जातो आहे. मिग्युएल यांना दोन गोळ्या लागल्या असून या गोळ्यांमुळे अन्य दोघेजण देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणी १५ वर्षे वयाच्या मुलाला अटक करण्यात आली असून त्याकडून बंदूक ताब्यात घेण्यात आली आहे. या हल्ल्यामागील सूत्रधाराला पकडण्यासाठी कोलंबियाच्या सरकारने रोख बक्षिस जाहीर केले आहे.
कोलंबियाचे अध्यक्ष गस्ताव पेट्रो यांनी या हल्ल्यानंतर फ्रान्सचा आपला नियोजित दौरा रद्द केला आहे. त्यांनी या प्रकरणाची पुर्ण पारदर्शीपणे तपास करण्याचे आणि दोषींना पकडण्याचे आश्वासन दिले आहे. उरीबे टर्बे हे एका पत्रकाराचे पुत्र आहेत. त्यांच्या वडिलांचे १९९१ मध्ये देशातील सर्वात हिंसक काळात अपहरण करून हत्या करण्यात आली होती. कोलंबियामध्ये ३१ मे २०२६ रोजी पेट्रो यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतरच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी ही अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.





