Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; बसचालकाचा जागीच मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावर पुण्याहून नागपूरकडे जाणा-या लक्झरी बसची धडक ट्रकला बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना अमरावतीच्या जवळ असणा-या धामणगावजवळ पहाटेच्या सुमारास घडली. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. पुणे ते नागपूर जाणाऱ्या या लक्झरी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून जवळपास 15 जण यात जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पहाटे घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरमधील गोठेघरजवळ आज भीषण अपघात झाला. बस ,कंटेनर, ट्रक व टेंपोचा विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे. सदर अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातात 15 ते 16 जण जखमी झाले असून दोन ते तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





