Sameer Wankhede : समीर वानखेडेंना न्यायालयाचा दणका ! आर्यन खानविरोधतील ‘ती’ याचिका फेटाळली
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सीरिजवर त्यांची प्रतिमा खराब

Sameer Wankhede : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सीरिजवर त्यांची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत मानहानीची याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावली आहे.
या याचिकेत समीर वानखेडेंनी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, तसेच सीरिजमधून ड्रग्स केसशी संबंधित कंटेंट तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. या रकमेचा वापर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा दावा त्यांनी केला होता.
वानखेडेंनी सीरिजमधील एका सीनवर विशेष आक्षेप घेतला होता. या दृश्यात एक नार्कोटिक्स अधिकारी नशा करत असलेल्या डीजेजवळ जातो, नंतर तो एका तरुणाकडे इशारा करत म्हणतो की तो स्टार किड नाही आणि मस्ती करत असलेल्या त्या स्टार किडला ताब्यात घेतो.
या दृश्यातून आपल्याला लक्ष्य केले असून, आपली बदनामी करण्यात आल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. पुरुषेंद्र कुमार यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले की, या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार (ज्युरिस्डिक्शन) दिल्ली उच्च न्यायालयाकडे नाही. हा वाद केवळ मुंबईतील न्यायालयांमध्येच ऐकला जाऊ शकतो. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.






