संभाजी भिडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम

सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना कुत्रा चावल्याची घटना सोमवारी (१४ एप्रिल) रात्री घडली. एका धारकऱ्याच्या घरी भोजनासाठी गेले असताना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडताच कुत्र्याने त्यांच्या पायाला चावले. यात त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती भिडे यांचे निकटवर्तीय हणमंत पवार यांनी दिली.
पोलिस अधीक्षकांची भेट –
या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भिडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि संवाद साधला. भिडे यांनी आपली तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले आणि कार्यकर्त्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले.
महापालिकेची कारवाई –
या हल्ल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सांगली महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. माळी गल्ली परिसरात डॉग व्हॅन पथकाद्वारे कुत्रे पकडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिकांनी यापूर्वीही या परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या तक्रारी केल्या होत्या, परंतु आता भिडे यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.
संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठान –
वयाची ८० वर्षे ओलांडलेले संभाजी भिडे सांगलीत वास्तव्यास असतात. त्यांनी १९८० मध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना केली. सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकात या संघटनेचे कार्य आहे. दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रमांमुळे भिडे नेहमी चर्चेत असतात. या घटनेनंतरही त्यांचे दैनंदिन उपक्रम सुरू असल्याचे त्यांच्या अनुयायांनी सांगितले.





