प्रभात वृत्तसेवा पुणे – भारताच्या लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला आपल्या धर्माचे स्वातंत्र्य असले, तरी, कोणतेही सरकार कोणत्याही एका धर्माचा प्रचार- प्रसार करू शकत नाही. हे घटनाबाह्य कृत्य असून, ते संविधानविरोधी आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी शुक्रवारी व्यक्त केले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार उपेंद्र कुशवाहा यांच्या हस्ते डॉ. थोरात यांना समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष पंकज भुजबळ, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. शेफाली समीर भुजबळ, विशाखा भुजबळ, परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला अध्यक्ष मंजिरी धाडगे आणि महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव उपस्थित होते. महाराष्ट्रात जाती व्यवस्थेविरोधात कुणबी समाजाने मोठी चळवळ उभी केली, त्यातीलच काही घटकांचा बुद्धिभ्रम झाल्याने ते ब्राह्मणी विचारधारेला हातभार लावत आहेत. धार्मिक अवडंबर आणि कर्मकांड वाढत आहे. सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी धर्माचा उघडपणे प्रचार करत आहेत. महात्मा फुले यांना अपेक्षित परिवर्तन आजही आवाक्यात नाही, असेही डॉ. थोरात यांनी नमूद केले. म. फुले यांना अपेक्षित असलेले समाज परिवर्तन प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांनी घटनेची रचना केली. मात्र, नोकरशाहीने राज्यघटनेची योग्य अंमलबजावणी न केल्यामुळे समाजातील काही घटक त्यांच्या अधिकारांपासून आजही वंचित आहेत, असे खा. कुशवाह म्हणाले.या वेळी शिवरकर, समीर भुजबळ, हाके, चाकणकर यांनी मनोगत व्यक्त केले. पंकज भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शेफाली भुजबळ यांनी मानपत्राचे वाचन केले. बनकर यांनी आभार मानले. पवार, भुजबळांची अनुपस्थिती या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची अनुपस्थिती जाणवत होती. भुजबळ हे आजारी असल्याचे ते येऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी साडेसात वाजता फुलेवाड्यात येऊन दर्शन घेतले. मात्र, ते पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.