समरजितसिंह घाटगे शाहू समाधी स्मारक स्थळी नतमस्तक

शाहूंचे वारसदार समरजित घाटगे नाराज : भविष्यात रंगणार वाद

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याला शाहू महाराजांचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांना निमंत्रण नव्हते. छत्रपती शाहू महाराज, शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित असणाऱ्या या सोहळ्याला समरजित सिंह घाटगे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सिद्धार्थनगर परिसरातील नर्सरी बागेत विकसित करण्यात आलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्याला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार शरद पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्यातील वारसदार असणारे समरजितसिंह घाटगे यांना मात्र या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं नव्हते.  भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वारसदार आहेत.

आज सकाळी 10 वजाता समरजितसिंह घाटगे यांनी शाहू समाधी स्मारक स्थळी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले. माझ्या पणजोबांच्या समाधीचे दर्शन घेण्याला महापालिका प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही तसंच शाहू महाराज समाधी लोकार्पण सोहळ्याला मला निमंत्रित केले नाही, याची खंत आहे परंतु महानगरपालिकेने पुढाकार घेऊन शाहू स्मारक समाधी स्थळ सुशोभित केल्याबाबद्दल त्यांनी महापालिकेचे अभिनंदन केले.

दरम्यान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याच सर्वांना निमंत्रण दिले गेले होते. कोणीही या विषयावरती वाद न घालता हा विषय संपवला पाहिजे असं कोल्हापूरच्या महापौर ॲड. सुरमंजिरी लाटकर म्हणाल्या.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.