हातसफाई करणाऱ्या चोरट्यांची उपमहापौरांना सलामी

चोरटे मिळाले पण तक्रारदारच मिळेना
पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी मागे घेतल्याने शुक्रवारी भाजपच्या केशव घोळवे यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली. परंतु त्याच वेळी महापालिका भवनातील उपमहापौर दालनामध्ये तीन पाकिटमारांनी सुमारे 40 हजारांचा ऐवज चोरला. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने तीनपैकी दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मात्र आता तक्रारदारच मिळत नसल्याने या चोरट्यांचे काय करायचे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 6) होती. त्यानिमित्ताने महापालिका भवनात कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोठी गर्दी होती. त्याचा फायदा घेत पाकिटमारांनी महापालिका भवनात प्रवेश केला.
यावेळी घोळवे यांना शुभेच्छा देण्यासाठी आळंदीतील महाराज आले होते. त्यांच्या खिशावरही चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी एका कार्यकर्त्याच्या खिशात हात घालताना एका व्यक्तीने या दोघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. मात्र, त्यांच्याकडून चोरलेली रक्कम काढून घेत चोरट्यांना पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, या प्रकारामुळे महापालिका भवनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दिलेली नाही.





