Satara: झेडपीत हुतात्म्यांना अभिवादन, संविधानिक मूल्यांचा जागर
Satara संविधानातील आदर्श तत्त्वे केवळ शब्दांपुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात तसेच प्रशासकीय कामकाजात आचरणात आणणे, सामाजिक समता व न्यायाची भावना रुजविणे आणि प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक हक्क व कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हाच संविधान दिनाचा खरा संदेश आहे. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Satara: संविधान दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रारंभी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील,शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ.ऋतुजा शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्कर्ष कवठेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, कार्यकारी अभियंता संजय खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यानंद चल्लावार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व विशद करताना संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधार असून प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची हमी देणारा सर्वोच्च मार्गदर्शक दस्तऐवज असल्याचे अधोरेखित केले.त्यानंतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या माध्यमातून संविधानाने दिलेल्या मूलभूत मूल्यांचा आदर राखण्यासह लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आपली बांधिलकी व्यक्त करण्यात आली.
संविधानातील आदर्श तत्त्वे केवळ शब्दांपुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात तसेच प्रशासकीय कामकाजात आचरणात आणणे, सामाजिक समता व न्यायाची भावना रुजविणे आणि प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक हक्क व कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हाच संविधान दिनाचा खरा संदेश आहे. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





