बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याच्या आगामी “राधे’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये खास क्रेझ आहे. हा चित्रपट यावर्षीच प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाउनमुळे तसे होउ शकले नाही. आता अनलॉकनंतर पुन्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे. सलमान खानचा हा मोस्ट वॉन्टेड चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित न करता चित्रपटगृहात रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. आता हा चित्रपट पोस्ट-प्रोडक्शनच्या फेजमध्ये असताना चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे निर्माता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु सलमान खानचा “राधे’ चित्रपटास निर्माता-दिग्दर्शक ओटीटीवर रिलीज करू शकतात. याबाबत सध्या डील सुरू आहे. जर निर्मात्यांना वेब प्लॅटफॉर्मने योग्य मोबदला दिल्यास यावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येईल. दरम्यान, डिजिटल प्लॅटफॉर्म आवडत नसल्याचे सलमान खान याने अनेक वेळा स्पष्टपणे सांगितले आहे. सलमानने आपल्या चित्रपटांना डिजिटल रिलीज करण्यास प्रत्येकवेळा नकार दिला आहे. परंतु आता 7 ते 8 महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने अनेक सुपरस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळालेले आहेत. यामुळे सलमान खान कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.