Salman Khan case – दोन अनोळखी व्यक्तींनी अभिनेता सलमान खानच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेनंतर मुंबई पोलीसांनी तातडीने पावले उचलताना, सलमान खानच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत. घुसखोरी करणाऱ्या ईशा छाबड़ा (मॉडेल आणि अभिनेत्री) आणि जितेंद्र कुमार (छत्तीसगडचा रहिवासी) या दोघांनाही पोलीसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. सलमान खानच्या अपार्टमेंटमध्ये घुसखोरी झाल्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी इंटरनेटवर मुंबई पोलीसांना धारेवर धरले आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आजकाल अनेक सोसायट्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था असते. जर कोणताही अज्ञात माणूस सोसायटीच्या गेटवर आला, तर त्याला सुरक्षा रक्षकाला सांगावे लागते की तो कोणाला भेटायला आला आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षक त्या घरी इंटरकॉमवर कॉल करून याची खात्री करतो आणि मगच त्याला आत सोडतो. जर सामान्य सोसायट्यांमध्ये हे नियम आहेत, तर वाय प्लस सुरक्षा असूनही सलमान खान याच्या बाबतीत हे नियम का नव्हते, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून मुंबई पोलीसांना विचारला जात आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या सुरक्षेसाठी नवीन योजना तयार करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक सतर्क राहून तपास सुरू केला आहे. सलमान खान याच्या घराच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे.