मुंबई – ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा राजकीय नेत्यांवर केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण होतात. मात्र आता संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
संजय राऊत यांना त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मॅसेज आला आहे. या मॅसेजमध्ये ‘हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॅारेन्स के और से मॅसेज है…. सलमान और तू फिक्स….तयारी करके रखना….’ असे म्हंटले आहे. या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
याप्रकरणाचा तपास केल्यानंतर संजय राऊत यांना धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नुकतेच यावर संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
राऊत म्हणाले की, “लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मी पोलिसात तक्रार केली आहे.” पुढे त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत म्हंटले की, “विरोधकांना आलेल्या धमकीची दखल सरकार घेत नाही. संपूर्ण सुरक्षायंत्रणा गद्दार गटामागे आहे. आम्हाला आलेलेल्या धमक्यांची चेष्टा केली जाते. विरोधकांना मारून टाकण्याचा सरकारचा हा डाव आहे.”