बाणेर आणि खडकी येथील दोन दुकानदारांवर कारवाई
पुणे – जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बाणेर व खडकी बाजार येथील दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पन्नाराम पुनाजी चौधरी (वय 43, रा. बालेवाडी) आणि गौरव राजेंद्र अगरवाल (वय 28, रा.नवा बाजार, खडकी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चतुःशृंगी आणि खडकी पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी बाणेर येथील दुकानदार पन्नाराम चौधरी हा शेंगदाणे 180 रुपये, तूरडाळ 160, मूगडाळ 155, चणाडाळ 140, खोबरे 280 आणि साबुदाणा 135 रुपये किलो याप्रमाणे किराणा मालाची विक्री करत असल्याचे दिसून आले. तसेच 1 एप्रिल रोजी खडकी बाजार येथे गौरव अगरवाल याचे किराणा भुसार मालाचे दुकान आहे. तो शेंगदाणे 140, खोबरे 220 प्रति किलो अशा दराने विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
ही कारवाई अंमली पदार्थ व खंडनी विरोधी पथक (पूर्व विभाग) पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर, पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, दिलीप जोशी, प्रवीण शिर्के, मोहन साळवी, अर्जुन दिवेकर, सुशील काकडे, प्रफुल्ल साबळे यांनी केली.