satara | नागरिकांसाठी वन विभागातर्फे सवलतीच्या दरात रोपांची विक्री
सातारा, (प्रतिनिधी) – वन महोत्सव 30 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. वृक्षलागवडीसाठी लोकांना उदयुक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी एच. एस. वाघमोडे यांनी दिली आहे.
ज्या शासकीय यंत्रणांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करावयाची आहे व त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे. मात्र त्यांच्याकडे रोपे निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद उपलब्ध नाही, अशा यंत्रणांना या वन महोत्सव कालावधीत उपलब्ध जागेच्या प्रमाणात वृक्षलावगड करण्यासाठी आवश्यक रोपांचा मोफत पुरवठा नजिकच्या रोपवाटिकेतून रोपांचा उपलब्धतेनुसार केला जाईल.
त्याचबरोबर शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांना वन महोत्सव कालावधीत मागणीनुसार मोफत रोपांचा पुरवठा केला जाईल. तसेच पोलीस, संरक्षण बल यांना मोफत रोपांचा पुरवठा केला जाईल.
विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, सातारा यांच्या अधिनस्त 10 परिक्षेत्रामध्ये रोपे उपलब्ध असून वन महोत्सव कालावधीत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने विविध विभागांनी सवलतीच्या दरात रोपे घेऊन वृक्ष लागवड करावी, असेही आवाहन श्री. वाघमोडे यांनी केले आहे.





