Crime News : कल्याणी नगरमधील बॉलर पबवर ड्राय डे दिवशी मद्यविक्री; मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : कल्याणी नगर येथील बॉलर पबमध्ये ड्राय डे असतानाही मध्यरात्री मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर येरवडा पोलिसांनी कारवाई करत मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 12.30 वाजता रामवाडी मार्शल यांना नियंत्रण कक्षातून कॉल प्राप्त झाला. त्यानुसार, बॉलर पबमध्ये ड्राय डे दिवशी मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर रात्री पाळीचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक फटांगरे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, पबमध्ये रात्री 1.10 वाजता मद्यविक्री सुरू असल्याचे आढळले.
या प्रकरणात पबचे मॅनेजर रेमंड फ्रान्सिस डिसोजा ( 45, रा. राजहंस कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 557/2025, कलम 223, 293 भा.दं.सं. सह 33(w)/131 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




