सातारा | सज्जनगड पायरी मार्गावर वृक्षदिंडीचा गजर

ठोसेघर – चिंब पावसात भिजत, हातात भगवे झेंडे, छत्रपती शिवरायांचा जयजयकार आणि ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी घोषणा देत, ढोल-ताशांचा निनादात आणि लेझीमच्या साथीत परळी येथे वृक्षदिंडी काढण्यात आली.
दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात आलेल्या या दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपणाबरोबर वर्षभर संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विस्तार अधिकारी शंतनू राक्षे, परळीचे वनपाल सोळंकी, पत्रकार दीपक शिंदे, सामाजिक वनीकरणच्या साधना राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
परळी येथे सकाळी 7 वाजता श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी, दुर्गनाद प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धक, परळी पंचक्रोशीतील विविध मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, बचत गटांच्या महिला, एफडीएफआयचे सदस्यांनी पावसाच्या सोबतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. सज्जनगड पायरी मार्गावरील मधली टाकी परिसरात दिंडी पोहोचल्यावर छत्रपती शिवरायांचा ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र खड्या आवाजात म्हणण्यात आला. त्यानंतर दीडशेहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. या झाडांचे वर्षभर संवर्धन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. काडसिद्धेश्वर मठात सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
दुर्गनाद प्रतिष्ठानचे कौतुक
परळी खोर्यातील युवक एकत्र येऊन दुर्गनाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सज्जनगड संवर्धन मोहिमा राबवण्यात येत आहेत. त्यामुळे गडावरील अनेक बुरुज, तटबंद्या झाडाझुडपांपासून मुक्त झाल्या आहेत. गतवर्षी सज्जनगडावर केलेले वृक्षसंवर्धन पाहून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गडाची स्वच्छता आणि वृक्षारोपणातून पर्यावरण समतोल, हे ब्रीद घेऊन ही संघटना कार्यरत आहे.





