महाराष्ट्राला वेड लावणारा ‘सैराट’ पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार

Sairat Movie | दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट लोकप्रिय ठरला. मराठी सिनेसृष्टीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयांची कमाई केली होती. २०१६ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येणार आहे. यात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका होती. यातील त्यांच्या आर्ची आणि परश्याच्या जोडीला रातोरात प्रसिद्धी मिळाली.
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ‘सैराट’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता. तसेच चित्रपटाला जोड म्हणून अजय-अतुल यांची गाण्यांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. या अभूतपूर्व यशानंतर ‘सैराट’ आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
View this post on Instagram
याबाबत आनंद व्यक्त करत नागराज मंजुळे म्हणाले की, “आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केले होते. सैराटने महाराष्ट्रातच नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळते. याहून आनंद काय असू शकतो? यासाठी मी झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल, याची मला खात्री आहे.” तर सैराटच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. Sairat Movie |
हेही वाचा:
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन ‘बेस्ट अभिनेता’; वाचा पुरस्कार आणि नामांकनांची सविस्तर यादी !




