Tanaji Galgunde | Sairat | ‘सैराट’ हा मराठी चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला जणू भेटच होता. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळे स्थान मिळवले आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांना इंडस्ट्रीत मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 29 एप्रिल 2016 रोजी ‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जवळजवळ सर्वच कलाकार नवीन होते. पहिल्यांदाच त्यांनी सिनेक्षेत्रात काम केले होते. मात्र तरीही या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. चित्रपटातील संगीत, गाणी आणि डायलॉग जबरदस्त सुपरहिट ठरले होते. रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या सोबतच चित्रपटातील सहकलाकार तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख ही मंडळी प्रकाशझोतात आलीत. त्यानंतर त्यांच्या करिअरला देखील चांगलीच कलाटणी मिळाली. ‘सैराट’मधील लंगड्या म्हणजे अभिनेता तानाजी गळगुंडे याने नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याची लग्नाविषयीची मतं मांडली आहेत. यावेळी त्याने अतिशय स्पष्ट मत बोलून दाखवलं आहे. त्याने म्हटलं की, ‘मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. म्हणजे मी कदाचित आता खूप पुढे गेलो असेन पण मला आता पटतं ते लिव्ह इन रिलेशनशिप. एकतर ते लग्नाआधी बघायचं, त्या मुलीला आवडतोय की नाही माहित नाही आणि लग्न करायचं. सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि एका दिवसासाठी का एवढं अवडंबर करायचा’. असं तो यावेळी म्हणाला. “तामजाम एवढा मोठा करायचा, 5-10 लाख रुपये खर्च करायचा. खर्च करुन वाजत गाजत वरात काढायची, नाचायचं बँड बाजा लावून. चांगली गोष्ट आहे, नाचू आपण पण एखादी छोटीशी पार्टी करावी, जर लग्न करायचंच आहे आता माझा विचार वेगळा आहे की मला लिव्ह इन रिलेशनशिप हे ग्रेट वाटतं. पण लग्न करायचं तर मग ते रजिस्टर करावं असं मला वाटतं. असं त्याने यावेळी बोलून दाखवलं. दरम्यान, सैराटनंतर तानाजी ‘गस्त, झुंड, माझा अगडबम, फ्रिट हिट दणका, एकदम कडक आणि घर बंदूक बिरयानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांचीही मनं जिंकलीत.