Sad News : ‘सैराट’ फेम ‘सल्या’वर दुःखाचा डोंगर; वडील अस्लम शेख यांचं उपचारादरम्यान निधन
Sad News : 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख यांचे वडील अस्लम शेख यांचे मेंदूच्या आजारावर उपचार सुरू असताना निधन झाले. उपचारादरम्यान रुग्णालयाविरोधातील आरोप, सरकारी कारवाई आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घ्या.

Sad News : मराठीतील गाजलेल्या ‘सैराट’ चित्रपटातून ‘सल्या’ ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे मेंदूशी संबंधित आजारावर उपचार सुरू असतानाच निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम शेख यांच्यावर सुरुवातीला सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूविषयक विकारामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. वडिलांच्या उपचारासाठी अरबाज शेख सातत्याने प्रयत्न करत होता. त्यांना वाचवण्यासाठी त्याने सर्वतोपरी धडपड केली होती.
याच काळात अरबाजने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत, “मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे,” म्हणाला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि अनेकांनी त्याला धीर दिला होता. आर्थिक मदतही केली होती.
रुग्णालयावर गंभीर आरोप, FDA ची कारवाई –
वडिलांच्या उपचारादरम्यान अरबाज शेखने संबंधित खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते. उपचारासाठी वारंवार जादा पैशांची मागणी केली जात असल्याचा दावा त्याने सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे केला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संबंधित रुग्णालयातील मेडिकलवर कारवाई केली होती. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.
वैयक्तिक आयुष्यातही मोठा आघात –
‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अरबाज शेख विविध माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वडिलांच्या प्रकृतीमुळे तो मोठ्या मानसिक तणावाखाली होता.
अरबाजने तीन वर्षांपूर्वी आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाह केला होता. काही महिन्यांपूर्वी त्याने लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. संसाराची नवी वाट सुरू असतानाच आता वडिलांच्या निधनामुळे त्याच्यावर मोठा वैयक्तिक आघात झाला असून डोक्यावरचे वडिलांचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे.





