Saif Ali Khan । Shah Rukh Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस संशयिताची चौकशी करण्याची तयारी करत आहेत.
सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणण्यात आलं आहे. पोलिसांनी या आरोपीविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलेला आरोपी आणि पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयिताची शरीरयष्टीसारखीच दिसत असल्यामुळे हल्लेखोराला पकडल्याचं बोललं जात आहे. मात्र, पोलिसांनी सध्या यावर भाष्य करण टाळले. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.
जोवर तोच हल्लेखोर आहे हे स्पष्ट होत नाही तोवर काही माहिती जाहीर केली जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची 20 पथकं तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यापूर्वी अभिनेता शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी करण्यात आली होती. आता याप्रकरणी देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर 14 जानेवारी रोजी काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्ती लोखंडी शिडीवर चढून शाहरुखचं घर न्याहाळून पाहताना आढळून आली. ‘मन्नत’च्या मागील बाजूला ही 6 ते 8 फुटांची ही शिडी आढळून आली. या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांना शंका आली असल्याने त्यांनी आता तपास सुरु केला आहे.
‘मन्नत’मधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली व्यक्तीची उंची आणि शरीरयष्टी ही सैफच्या घराजवळ आढळून आलेल्या संशयित आरोपीशी ताळमेळ खाणारी आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमगे एकच व्यक्ती असल्याची शंका पोलिसांना आहे.
‘मन्नत’च्या मागील बाजूस सापडलेली शिडी ही एकट्या माणसाला उचलता येण्यासारखी नसून ही दोन ते तीन जणांची टोळी असू अशी शक्यता आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता शाहरुख खान याने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसून, पोलिसात तक्रार देखील नोंदवली नाही.