Saif Ali Khan Case Updates : सैफ अली खान प्रकरणात दररोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. खरंतर, मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा चुकीचा माणूस म्हणून ताब्यात घेतला असून, पोलिसांच्या या चुकीमुळे आकाशचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. कारण यामुळे आकाशची नोकरी गेली आणि त्याचे लग्नही मोडले आहे. स्वतः त्याच्या वडिलांनी याबद्दल माहिती दिली आहे. सैफ अली खान याच्या घरात 15 जानेवारीच्या मध्यरात्री एक चोर घुसला आणि त्याने सैफवर हल्लाही केला. याप्रकरणानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडलं. अखेर तीन दिवसांनी 19 जानेवारी रोजी ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून मूळ आरोपी मोहम्मद शरीफुलला ताब्यात घेण्यात आलं. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं, पण तो मूळ आरोपी नसल्याचे तपासात उघड झाल्यान पोलिसांनी त्याला सोडून दिलं. मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे त्या तरूणाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. आकाशाचे वडील सांगतात की, “माझा मुलगा आकाश त्या दिवशी कल्याणला ट्रेनमध्ये बसून बाहेरगावी जात होता. पण त्याला दुर्ग स्टेशनवर आर पी एस अधिकाऱ्यांनी थांबवलं आणि खाली उतरवलं. तेथे मुंबई पोलिस आले आणि त्यांनी त्याची 8-10 तास चौकशी करण्यात आली. मात्र आकाश हा तो हल्लेखोर नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं, मग त्यांनी त्याला सोडून दिलं. पण या घटनेचा त्याच्यावर परिणाम झाला आहे. आता आकाशला मुंबई पोलिसांच्या चुकीचे परिणाम भोगावे लागत आहेत. कारण यानंतर ते टीव्हीवर प्रसारित झाले आणि आकाशला त्याच्या खाजगी कंपनीने नोकरीवरून काढून टाकले. एवढेच नाही तर त्याचे लग्नही यामुळे मोडले. त्याला आता कोणी नोकरीवर देखील घेत नाही. त्याचे वडील म्हणतात, मुंबई पोलीसांनी आपली चूक कबूल करावी, त्याच्याबद्दल माहिती द्यावी अशी त्यांची मागणी आहे. माणुस कसाही जगू शकतो परंतु बदनामीमुळे जगू शकत नाही. त्या घटनेचा मुलावर परिणाम… त्याचं दु:ख त्याला माहित आहे, तो आमच्यासोबतही नीट बोलत नाही’. असं देखील त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. आकाश कायदेशीर लढाई लढत आहे… ही घटना मुंबई पोलिसांनी आरपीएफला पाठवलेल्या चुकीच्या अलर्टमुळे घडली, ज्यामध्ये आकाश हा सैफ अली खानचा हल्लेखोर असल्याचे म्हटले होते. नंतर पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला ठाण्यातून अटक केली. आकाशने सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची विनंती केली पण त्याची विनंती ऐकली गेली नाही. अटक करण्यात आलेली व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळत नाही, अशी चर्चा आधीच इंटरनेटवर सुरू होती. आता आकाश इंटरनेटवरून त्याचे खोटे ओळखपत्र असलेले फोटो काढून टाकण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. आरोपींशी बोटांचे ठसे जुळले नाहीत : आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की भारतात आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विजय दास असे ठेवले होते. आता ताजी बातमी अशी आहे की गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेले बोटांचे ठसे शरीफुलच्या बोटांच्या ठशांशी जुळत नाहीत. सीआयडीने मुंबई पोलिसांना फिंगरप्रिंट नमुन्याचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला आहे. तसेच न्यायालयाने शरीफुलची पोलिस कोठडी 29 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे? 15 जानेवारी रोजी सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी एका चोराने चाकूने वार केले. पहाटे 2 वाजता, सैफला त्याच्या घरात काही आवाज ऐकू आला आणि तो त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या घरातील एका मोलकरणीवर हल्ला झाला आहे. जेव्हा त्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोराने त्याच्यावर सहा वेळा चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर सैफच्या घरातील आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्यामध्ये तो पायऱ्या उतरताना दिसत आहे. पोलिसांनी त्याच्यासारख्या दिसणाऱ्या आकाश कनौजिया या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, सीसीटीव्हीमधील ही व्यक्ती नाही अशी चर्चा सुरू झाली. नंतर, पोलिसांनी ठाण्यातून खऱ्या आरोपीला अटक केली, ज्याची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून झाली. त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे. सध्या हा आरोपी पोलीस कोठडीत आहे.