“साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही” ; वाराणसीतील मंदिरातून मूर्ती हटवल्या, नव्या वादाला तोंड फुटणार?

Saibaba Idols । देशात साईबाबांना मानणारा मोठा समुदाय आहे . मात्र या समुदायाच्या भावना दुखावणारी घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये घडली आहे. त्याठिकाणच्या मंदिरांमधून सनातन रक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे साईबाबांच्या मूर्ती हटवायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. साईबाबा हे हिंदू नसून ते मुस्लिम असल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने आता देशात नवीन वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसत आहे.
14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवून गंगेत विसर्जन Saibaba Idols ।
दरम्यान, सनातन रक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत शहरातील 14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवून त्यांचे गंगेत विसर्जन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये बडा गणेश मंदिराचाही समावेश आहे. सनातन रक्षक संस्थेकडून वाराणसीच्या आणखी 28 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येणार आहेत. साईबाबा मुस्लीम होते. त्यांचा सनातन हिंदू धर्माशी कोणताही संबंध नाही. कोणीही साईबाबांची भक्ती, पूजाअर्चा करत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र, आम्ही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती ठेवून देणार नाही, अशी भूमिका सनातन रक्षक संघटनेचे अजय शर्मा यांनी घेतली आहे.
या सगळ्यासाठी सनातन रक्षक संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला दिला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात साईबाबा यांना चांदबाबा म्हणावे, असे नमूद करण्यात आल्याचा दावा सनातन रक्षक संघटनेच्या दीपक यादव यांनी केला. याबाबत रविवारी चर्चा झाल्यानंतर सनातन रक्षक संघटनेकडून सोमवारपासून वाराणसी येथील मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवायला सुरुवात झाली होती.
मुळात साईबाबांची मूर्ती ज्यावेळी मंदिरांमध्ये बसवण्यात आली, तेव्हाच विरोध व्हायला हवा होता. मंदिरांमधील पुजारी आणि ब्राह्मण समुदायाने साईबाबांची पूजाअर्चा करण्यापासून दूर राहिले पाहिजे. ज्यांना साईबाबांची पूजाअर्जा करायची आहे, त्यांनी स्वतंत्र मंदिर तयार करावे आणि त्यांची भक्ती करावी. आमचा त्याला विरोध नाही, असेही दीपक यादव यांनी सांगितले.
देशातील अनेक भक्तगण शिर्डीला का जातात, असा प्रश्नही दीपक यादव यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, हिंदू धर्माने आजवर सर्व विचारधारा सामावून घेतल्या आहेत. त्यामुळे अनेकजण शिर्डीला जातात. त्यामध्ये काही गैर नाही. ज्या लोकांना साईबाबांची भक्ती करायची आहे, त्यांनी ती करावी. आम्ही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही, असे यादव यांनी म्हटले.
हनुमानगढी मंदिरांच्या महतांचांही साईबाबांना विरोध Saibaba Idols ।
योग्य माहिती नसल्याने आतापर्यंत मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्तीची पूजा केली जात होती. साईबाबा हे धर्मगुरु, पीर, अवलिया असू शकतात, पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. त्यामुळे वाराणसीच्या मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरांमधून चांदपीर (साईबाबा) यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत, असे अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी म्हटले.





