प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – कर्नाटकमधील काली व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या दोन स्वतंत्र जंगलांना जोडणारा नैसर्गिक व्याघ्र कॉरिडॉर सातारा जिल्ह्यातून जातो. या मार्गामुळे दोन्ही जंगलांतील वाघ आणि इतर वन्यजीवांची जनुकीय देवाणघेवाण होते, त्यामुळे हा कॉरिडॉर पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प काली व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा मुख्य दुवा असून, याच मार्गावरुन वाघांसह बिबटे, हरणे व गव्यांची नियमित हालचाल होत असल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांनी मान्य केले आहे. तरीही या कॉरिडॉरवर वन्यजीवांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक भौतिक उपाययोजना अद्याप अपुऱ्या आहेत. वन्यजीव क्रॉसिंग दर्शवणारे फलक, गतिरोधक, वाहनांची वेगमर्यादा आणि चेतावणी फलक अजूनही रस्त्यांवर उभारलेले नाहीत. परिणामी वन्यजीव अपघातांचा धोका सातत्याने वाढत असल्याचे स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञ मानतात.प्रभातमध्ये व्यक्त केलेली तज्ज्ञांच्या मतांनुसार कॉरिडॉरवरील हालचाल, रस्त्यांवरील सुरक्षा उपाययोजना आणि वन्यजीव संरक्षण यासंबंधी ठोस निरीक्षणे दिली आहेत. ही मते व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन करताना उपयुक्त ठरू शकतात. मात्र, उपसंचालक किरण जगताप यांनी या तज्ज्ञ संचालकांची नावे व नंबर द्या, अशी मागणी केली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर सुविधा नसणे हे स्पष्ट असून तज्ज्ञांची नावे मागणे म्हणजे प्रशासनाच्या चुकीच्या कारभारावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न आहे, असा अंदाज पर्यावरण अभ्यासकांचा आहे. वन्यजीव सुरक्षा उपाय हवेत… सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात दोन- तीन तज्ज्ञ वगळता इतर तज्ज्ञांची माहिती वन्यजीव विभागाकडे उपलब्ध नसल्याचे उपसंचालकांनी सांगितले. तज्ज्ञांच्या निरीक्षणांतील मुद्द्यांवर आधारित उपाययोजना करणे अपेक्षित होते, असे अभ्यासकांचे मत आहे. कॉरिडॉर असल्याचे मान्य करूनही रस्त्यावर वन्यजीव सुरक्षित राहतील यासाठी साधे फलक, गतिरोधक आणि वेगमर्यादा का लागू केले जात नाहीत? विकासावर निर्बंध लागू करणे आणि वन्यजीव संरक्षणासाठी उपाय न करणे यावर प्रश्न उपस्थित होतो. काली व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर सातारा जिल्ह्यातून जातो आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा त्या कॉरिडॉरचा मुख्य भाग आहे, तरीही रस्त्यांवर आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वन्यजीव अपघातांचा धोका वाढत आहे.