मुंबई – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत व देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने मानाच्या फेलोशिपची व वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली.
अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फेलोशिपसाठी 7 साहित्यिकांची तर 24 भाषांतील अनुवाद पुरस्कारांची निवड जाहीर करण्यात आली. प्रख्यात इंग्रजी साहित्यिक रस्किन बॉन्ड, यांच्यासह हिंदीतील विनोद कुमार शुक्ल, बंगालीतील शिर्षेंद्रु मुखोपाध्याय,पंजाबीत तेजवतसिंग गिल, संस्कृतमधील स्वामी रामभद्राचार्य, मल्याळम लेखिका एम. लिलावती आणि तमिळ साहित्यासाठी इंदिरा पार्थसारथी या नामांकितांनाही ही पेलोशिप देण्यात आली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिध्द लेखक भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषेतील साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. मराठीसह बंगाली, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, संस्कृत आणि तामीळ भाषेतील योगदानासाठी साहित्यिकांनाही मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, कथा संग्रह आणि समिक्षात्मक अशी एकूण 15 पुस्तके प्रकाशित आहेत. नेमाडे यांनी लंडन स्थित “स्कुल ऑफ ओरियंटल अँड आफ्रीकनस्टडीज’सह विविध विद्यापीठांमध्ये इंग्रजी, मराठी आणि तौलानिक साहित्याविषयी अध्यापनकार्य केले आहे. महाराष्ट्रातील लघु मासिकांच्या चळवळीतील अध्वर्युपैकी ते एक आहेत. साहित्यिक योगदानासाठी त्यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार , ज्ञानपीठ पुरस्कार, ह. ना. आपटे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आदी मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलानिक साहित्यिक अध्यासनाचे प्रमुख म्हणून नेमाडे निवृत्त झाले. सध्या ते गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागांतर्गत सोहिरोबनाथ अंबिये अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.